सोलापूर - शहरातील अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी सहकार विभागाने धडक कारवाई केली आहे. दोन स्वतंत्र पथकांनी शहरातील दोन ठिकाणी छापे टाकून घरांची झडती घेतली. यामध्ये एका ठिकाणी अवैध सावकारीशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे आढळल्याने युवराज अशोक जानकर यांच्याविरुद्ध एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन, जिल्हा उपनिबंधक मुकुंद पवार आणि शहर उपनिबंधक उमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. ४ नोव्हेंबर रोजी कर्णिक नगर, यल्लालिंग मठाजवळील वज्रेश्वर नगर परिसरात युवराज जानकर यांच्या घराची झडती घेण्यात आली. यावेळी लोकांकडून घेतलेले कोरे धनादेश, कोरे बाँड, अनामत ठेव पावत्या, इसारा पावत्या, करारपत्रे, खरेदीखत तसेच आर्थिक व्यवहारांशी संबंधित स्टॅम्प पेपर आणि वाहन खरेदीची कागदपत्रे आढळली.
या प्रकरणी महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ मधील कलम ३९ व ४१ अन्वये ५ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.दरम्यान, दुसऱ्या पथकाने ललितकुंज नगर परिसरातील निलेश चंद्रकांत हरे यांच्या घराची झडती घेतली. मात्र, तेथे अवैध सावकारीसंदर्भातील कोणतेही आक्षेपार्ह दस्तऐवज आढळले नाहीत.
अवैध सावकारी, जादा व्याज आकारणी किंवा कर्जवसुलीसाठी होणाऱ्या त्रासाबाबत नागरिकांनी निर्भयपणे तक्रारी कराव्यात. अशा तक्रारींची दखल घेऊन कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आवाहन सहकार विभागाने केले आहे.

0 Comments