शरद पवार उद्या माढ्यातील तुळशी गावात; दुष्काळी परिस्थितीची करणार पाहणी


माढा - माढा तालुक्यातील तीव्र दुष्काळी परिस्थिती, भीषण पाणीटंचाई आणि शेती नुकसानीची पाहणी करण्यासाठी देशाचे ज्येष्ठ नेते तथा खासदार शरदचंद्र पवार उद्या, रविवार दि. १ नोव्हेंबर २०२६ रोजी तुळशी (ता. माढा) येथे येत आहेत. सकाळी १० वाजता त्यांचे तुळशी गावात आगमन होणार असून, या दौऱ्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

माढा तालुक्यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, दुष्काळाच्या तीव्र झळांमुळे हैराण झालेल्या ग्रामस्थांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संपूर्ण 'तुळशी गावच विक्रीला' काढल्याची घटना घडली होती. या निर्णयामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती आणि परिसराचे लक्ष या गंभीर समस्येकडे वेधले गेले होते.

या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचा हा पाहणी दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. या दौऱ्यादरम्यान ते प्रत्यक्ष शेतांवर जाऊन पाहणी करतील आणि स्थानिक शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या व्यथा व अडचणी जाणून घेतील.दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ भरीव आर्थिक मदत मिळावी, भीषण पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना व्हाव्यात आणि शासनाकडून ठोस दिलासा मिळावा, अशी आग्रही अपेक्षा तुळशीतील ग्रामस्थ व शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments